चोर सोडून संन्याशाला त्रास - कर्नाटक शासनाचा अजब कारभार

        



            बंगलोर येथे शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केल्याच्या कारणामुळे बेळगाव मध्ये तणाव निर्माण झाला होता. बेळगावच्या धर्मवीर संभाजी  महाराज चौकात मराठी भाषिकांनी आपला रोष व्यक्त करत शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या लोकांना त्वरित अटक करून कडक शासन करावे अशी मागणी केली. यावेळी काही समाज कंटकांनी मराठी भाषिकांना या घटनेत गोवण्यासाठी संगोळी रायन्ना यांच्या पुतळ्याची विटंबना केली व सदर घटना मराठी भाषिकांनी सूड घेण्यासाठी केल्याचा आरोप करत वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला आहे. बेळगाव मध्ये सुरु असणाऱ्या कर्नाटकाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारला खुश करण्यासाठी पोलीस प्रशासनाने ज्या मराठी लोकांनी न्याय देण्याची मागणी केली त्यांच्यावरच गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. आंदोलन करणाऱ्या मराठी लोकांनी पोलिसांवर दगडफेक करत खून करण्याचा प्रयत्न  केला असा ठपका ठेवत  ३०७ कलम सारखें  गंभीर गुन्हा दाखल  केले  आहेत. अश्या खोट्या गुन्ह्यांमुळे सीमाभागात आणखीन  संताप पसरला आहे. बेळगाव शहरात या घटनेनंतर १४४ कलम लागू केला आहे . सदर जमावबंदीचा आदेश बुधवारी दि २२ च्या सकाळी ६ वाजेपर्यंत लागू केला असून या नंतर काही कानडी संघटनांनी बेळगाव मध्ये संगोळी रायन्ना यांच्या मूर्तीच्या विटंबनेचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढला पण पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही विशेष कारवाई केली नाही. हे कार्यकर्ते बेळगावच्या बाहेरून आले होते त्यांना नाममात्र अटक करून त्यांना शहराबाहेर सोडून दिले. पोलिसांच्या या दुट्टपी वागण्यामुळे मराठी भाषिकांतून संताप वक्त करण्यात येत आहे. बंगळूर येथील पुतळा विटंबना प्रकरणावरून आतापर्यंत ७ जणांना अटक करण्यात आली आहे. या लोकांवर दुष्कृत्य आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप ठेवून अटक केली आहे. महाराष्ट्रात कन्नड ध्वज जाळला याचा सूड घेण्यासाठी हे कृत्य केल्याची  कबुली त्यांनी दिली आहे. पण  सुरवात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांना फासले गेले व चित्रदुर्ग येथे भगवा ध्वज जाळला त्या नंतर झाली याचा विसर या लोकांना पडलेला दिसतो. 

                   या संपूर्ण घटनेनंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याना बंगलोर ची घटना क्षुल्लक वाटते आणि बेळगावची घटना गंभीर स्वरूपाची वाटते.. यावरून हा शासकीय दुजाभाव नाही का ? मराठी लोकांनी आंदोलन केले म्हणून गंभीर गुन्हे दाखल पण ज्यांनी हे कृत्य केले त्यांच्यावर  सौम्य गुन्हे हा दुजाभाव नाही का ? विशेष म्हणजे महाराष्ट्रातील  विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची री ओढलेली दिसते. आणखीन एक  गोष्ट म्हणजे ज्या मराठी लोकांनी न्याय मागण्यासाठी निदर्शने केली त्यांनाच  आरोपी केले जात असून मराठी लोक कर्नाटकात बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेला कारणीभूत आहेत असा कांगावा आता कर्नाटकाकडून केला जात आहे. 

आत्तापर्यंत  ३२ मराठी लोकांना अटक करून त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रात्री अपरात्री घरात घुसून मराठी मुलांना अटक करण्यात अली आहे.एकूण ६१ जणांची यादी काढली असून आणखीन २०० लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  कर्नाटकातील मराठी भाषिकांप्रती सुरु असलेला हा ब्रिटीशराज आता थांबला पाहिजे. जेव्हा जेव्हा मराठी माणूस आपल्या हक्कांसाठी आंदोलन करतो तेव्हा त्यांच्या खोटे गुन्हे घालून मराठी लोकांचे मानसिक आणि सामाजिक खच्चीकरण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जेणे करून भविष्यामध्ये मराठी लोकांनी न्याय मागण्यासाठी पुढे येता कामा नये. हि एक प्रकारे लोकशाही ची हत्या आहे . आणि असे कृत्य या भारत भूमीवर फक्त ब्रिटिशांनी केले आहे.कर्नाटकातील  भाजप प्रणित सरकारने सीमाबांधवांवर सगळ्यात जास्त अत्याचार केले आहेत हे सुद्धा डोळेझाक करता येणार नाही. बेळगाव यामध्ये सातत्याने भाजप शासन काळात मराठी लोकांवर मोठ्या प्रमाणात दडपशाही करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भगवा ध्वज महापालिकेवरून हटविणे , भगवा ध्वज  जाळणे आणि आता शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करणे या सारख्या गोष्टी या भाजप शासनाचा काळात होत आहेत. 


सीमाभागात सध्या भाजप विरुद्ध प्रचंड असंतोष निर्माण झाल्याचे चित्र आहे. अगदी अलीकडेच विधान परिषद ची जागा भाजपाला गमवावी लागली. बेळगाव भागा मध्ये भाजप आमदारांची संख्या जास्त असून देखील विधान परिषद हरल्यामुळे भाजप आता आणखीन खालच्या पातळीवर उतरून राजकारण करीत असल्याचे बोलले जात आहे. कारण आधी धर्मावरून लोकांना विभागले आता भाषेवरून लोकांना  विभाजित करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी भाजप पुढे सरसावली आहे. सध्या  बेळगावमध्ये भाजपाला समिती कडून मोठा धोका संभवतो हे लक्ष्यात आल्यावर समिती कार्यकर्त्यांना लक्ष केले जात आहे. 

  भाषिक अल्पसंख्याकांचे अधिकार मिळावेत यासाठी २५ ऑक्टोबर ला मराठी भाषिकांनी मोर्चा काढला त्यांच्यावर कोरोना नियमांचे उल्लंघन केले या प्रकरणी गुन्हा दाखल केला पण त्याच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा प्रशासनाने शेकडो विद्यार्थ्यांना गोळा करून खासदार आणि इतर लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थिती मध्ये कार्यक्रम केला यातही कोरून नियमांचे उल्लंघन झाले होते पण यावर मातुर कोणतीच कारवाई झाली नाही. , हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी देखील विविध मागण्यासाठी मोर्चा काढला त्याच दरम्यान पण त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. या उलट फक्त मराठी भाषिकांना लक्ष करून त्यांच्यावर जमेल त्या पद्धतीने खटले दाखल करून मराठी लोकांनी मराठी भाषेच्या आणि संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या चळवळीतून बाहेर पडावे यासाठी केलेलं हे कृत्य आहे. 


    एकीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील कन्नड लोकांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे सांगतात. आणि दुसरकीड़े कर्नाटकातील काही मंत्री  महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घाला म्हणून मागणी करत आहेत. महाराष्ट्र सरकारात कडे वारंवार पाण्याची मागणी करणारे कर्नाटक सरकार सीमाभागात मात्र मराठी लोकांवर अत्याचार करण्याची एकही संधी सोडत नाही. सीमाभागातील मराठी लोकांवर दाखल केलेलं खोटे गुन्हे मागे घेतले जात नाहीत तो पर्यंत महाराष्ट्राने कडक  गरजेचे आहे. सतत मराठी भाषिकांना होणार त्रास यासाठी महाराष्ट्र सरकारने कडक इशारा देणे आता काळाची गरज बनले आहे. 

  गेली ६५ वर्षे सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वात संयुक्त महाराष्ट्रासाठी आंदोलन सुरु आहे. या काळात अनेक वेळा शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना केली आहे पण त्याचा सूद घेण्यासाठी मराठी भाषिकांनी कधीही इतर महापुरुषांचा अपमान केला नाही हे नमूद करण्यासारखे आहे. दर वर्षी १ नोव्हेंबराला काळा  दिन पाळला जातो त्यावेळी गोवावेस येथील बसवेश्वर चौकातून मोर्चा पुढे जातो पण ५६ ६० वर्षांत कधीही मराठी लोकांनी दुष्कृत्य केले नाही. शेकडो मोर्चे मराठी भाषिकांनी कित्तूर राणी चन्नमा चौकातून नेले पण तेथील प्रतिमेवर मराठी भाषिकांनी कधीही वाकडी नजर टाकली नाही. उलट त्या चौकातील कित्तूर राणी चन्नमा यांची मूर्ती मराठी सत्ताधारी असताना बेळगाव महापालिकेने बसवली आहे हे विशेष. त्यामुळे या संपूर्ण घटनेत मराठी लोकांना नाहक बदनाम करून राजकीय पोळी भाजून घेण्याचे खालच्या पातळीचे राजकारण सीमाभागात केले जात आहे. प्रामुख्याने मराठी भाषिकांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे खेळ कर्नाटकाने थांबविण्यासाठी महाराष्ट्राने कडक पावले उचलणे गरजेचे आहे.


फोटो सौजन्य - बेळगाव लाईव्ह आणि बेळगावकर 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रा स्वतःच्या अस्तित्वासाठी जागा हो..संयुक्त महाराष्ट्राचा धागा हो..

मराठीच्या पाऊलखुणा :- केरळ-कर्नाटकच्या सीमेवरील कासारगोड येथील मराठी लोक

माय मराठी.. माझी आई..