माय मराठी.. माझी आई..


 आई.... , दोन अक्षरं काळजाला हात घालतात आणि मन कितीही सैरभैर असल तरी शांत करतात .म्हणून ती आई.. जस आपल्याला आई जन्म देते आणि ती आपली जन्मदात्री होते तशीच आपल्याला ओळख देते अशी समाजात जन्माला घालणारी मराठी आई.. हो भाषा स्वरुपी आईच खऱ्या अर्थाने जन्माला आपल्याला घालते कारण या जगात आल्यावर पहिल्यांदा आपल्या तोंडातून ती भाषाच येते आणि ती सुद्धा एकच शब्द आई.. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, मग माय मराठीला दूर केलं तर आमच्या अस्तित्वाला तरी काय अर्थ? ही तीच माय मराठी आहे जी समाजातल्या सगळ्या घटकांना सोबत घेते आणि एकत्रित ठेवते. जात, धर्म , पंथ याचा भेदभाव न करता ती सगळ्यांना आपल्या पदराच्या मायेखाली प्रेमाचा निवारा देते. 

  पण आज त्याच पदराचा निवारा फाडून आम्ही वेगवेगळे झालो. आणि हे विसरून गेलो की आपल्या स्वार्थासाठी फडलेला त्या माय मराठीचा पदर त्या माय मराठीची अब्रू वेशीवर टांगत आहे. .. आहेत हो काही लेकर बाद असतील त्या माय मराठीच्या मायेचा गैरफायदा घेत असतील पण आज तुम्हा आम्हा बाकीच्या लेकरांची जवाबदारी नाही का ? त्या माय मराठीची अब्रू वाचवण्याची ? 

  मग आज तिची अब्रच नव्हे तर अस्तित्व संपुष्टात आले असताना आपण गप्प का आहोत. मावशी समजून आसरा देतो म्हणत आपल्याच आईचा गळा घोतटना आपण त्याचा प्रतिकार तर सोडाच उलट त्याचा असुरी आनंद घेत आहोत असे नाही का वाटत तुम्हाला ? आपण कुणाच्या बाजूने उभे आहोत याचा कधी तरी विचार करणार आहोत का आपण की काही जणांना दोष देवून दुसऱ्याच्या दारात थांबून आपल्या घराची राख रांगोळी होताना बघत बसणार आहोत ? जे लोक एरवी याच मराठी आईची अवहेलना करतात , तिरस्कार करतात तिला संपविण्यासाठी तिच्या लेकरांना त्रास देण्यासाठी जंग जंग पछाडत आज ते लोक स्वतःच्या फायद्यासाठी त्या मराठी आईला भरजरी नऊवारी घालून दागिन्यांनी मडवून काढून निवडणूक बाजारात वेष्या करून उभी केली आहे आणि आपल्याला वाटत आहे बघा मराठीचे कसे अच्छे दीन आहे आणि आपणच त्या मराठी आईला निवडणुकीच्या बाजारात अपमानित करत आहोत असे नाही का वाटत तुम्हाला.. मी हे सांगताना लगेच याला विरोध करण्यासाठी अनेक गोष्टी असतील तुमच्याकडे पण माझा विरोध करण्यापेक्षा एकदा तरी त्या मराठीचा छळ होताना विरोध करावासा नाही का वाटला तुम्हाला ? 

  हा मतांचा बाजार आहे कुणाला द्यावं कुणाला नाही हा सगळा शेवटी तुमचाच निर्णय पण एकदा मनातला सगळं राग, लोभ बाजूला ठेवून विचार करा आपण या आईसाठी कधी एकत्र येणार ? आई शिवाय जगण्याला अर्थ नाही म्हणतात तर मग भाषेशिवाय तुमच्या माझ्या जगण्याला तरी काय अर्थ? 

   आज जगाच्या पाठीवर कुठेही जा ज्या ठिकाणी भाषेसाठी एकत्र आलेत ते लोक आपल्या पेक्ष्या किती तरी पट पुढे गेले आहेत. जपान, जर्मनी, फ्रान्स, चीन, इंग्लंड, किती तरी देश आहेत जिथे भाषा हा त्या देशातील लोकांचा जगण्याचा आत्मा आहे.. कारण द्वेष पसरविणारी कुठलीही गोष्ट कुणाचाही उध्दार करू शकत नाही पण प्रेम देणारी प्रत्येक गोष्ट सुख नक्की देते. आणि या घडीला आपल्याला आपली भाषा हे प्रेमळ आई आहे जी समाजाची विस्कटलेली घडी नीट करू शकते आणि गुण्या गोविंदाने सर्व लोक एकत्र नांदुलागतील. 

 शेवटी विचार तुमचा आहे.  आपली ही माय मराठी कुणाचा तिरस्कार शिकवत नाही. किंबहुना कुठलीच भाषा तिरस्कार शिकवत नाही प्रत्येक भाषेचा सन्मान झाला पाहिजे पण तो असताना आपल्या माय मराठीचा पदर ओढायची कुणाची हिम्मत नाही झाली पाहिजे तर आणि तरच आपण त्या माय मराठीची लेकरे म्हणून घेण्याच्या पात्रतेचे ठरू.. 


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रा स्वतःच्या अस्तित्वासाठी जागा हो..संयुक्त महाराष्ट्राचा धागा हो..

Need Justice to the Farmers, who are Suffering because of Halga- Macche Bypass land aquicision at Belgaum