सातत्याने महाराष्ट्र एकीकरण समितीची बेअब्रू करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी राजकीय पक्ष्यांचे कारस्थान.



देशात भाषावार प्रांतरचना होण्या आधीपासून महाराष्ट्र एकीकरण समिती अस्तित्वात आहे. देशात राज्य निर्मिती करताना जे जे आयोग  नेमले गेले त्या सगळ्या आयोगाना  समितीने आपले निवेदन विस्तृत स्वरूपात दिले आहे. आमची मागणी कर्नाटकाच्या  निर्मिती आधी पासून आहे हे लक्ष्यात घ्यावं 

सातत्याने मराठी  माणसाला कन्नड विरोधी दाखवून  त्यांना दोषी सिद्ध करण्याचे नीच कृत्य राजकीय पक्ष करताना दिसतात. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वामध्ये सुरु असणारा बेळगाव सह वादग्रस्त मराठी बहुल सीमाभाग महाराष्ट्रात विलीन करण्याचा लढा हा केंद्र सरकारच्या विरुद्ध आहे. जस कन्नड लोकांना त्यांचे राज्य प्रिय आहे तसे आम्हाला आमचा महाराष्ट्र प्रिय आहे. 

नेहमी मराठी  लोकांना ऐकवले जाते कि कर्नाटकात राहता, इथलेच खाता वगेरे , अरे आम्ही आमच्याच राज्याचं खात होतो. आमच्याच राज्यात राहत होतो. हा मुंबई प्रांत होता. भाषावार प्रांत रचनेत हा भाग मराठी आहे हे सुद्धा मान्य केलाय कर्नाटक राज्याला कमी पडलं म्हणून कोणताही भक्कम आधार नसताना राजकीय स्वार्थासाठी आमचा बळी गेला. कर्नाटक राज्य कसे तयार झाले याचा कधीतरी अभ्यास करा समजेल कि बेळगावचे लोक आजही का आंदोलनावर ठाम आहेत. हीच गोष्ट महाराष्ट्रातील मराठी लोंकाना पण सांगतो , घरातील एक वाटी शेजाऱ्याच्या घरी राहिली म्हणून आकांडतांडव करणारे आपण लाखो लोकांचा मराठी भाग राज्यातून काढून दुसऱ्या राज्याला दिला तरी त्याची जाणीव  त्याची खंत तुमच्या मनात नाही ??? हे दुर्दैवी आहे. 

अनेक मराठी लोक म्हणतात आता आहेत तिथेच राहा. अरे का ??? का म्हणून आम्ही इथे राहायचं ? रस्ते - विकास याला भूल पडून ? मग स्वातंत्र का मिळवलं या देशाने ? रस्ते -आधुनिकता -विकास तर आत्ताच्या दळभद्री राजकारण्यांपेक्षा ते चांगलंच करत होते कि ? मग ब्रिटिशाना का हाकलून दिला या देशाने ? स्वातंत्र्य मिळविण्याचा जाज्वल्य इतिहास हा घडवला हे जर तुम्हाला कळले नसेल तर सीमाभागातील मराठी लोकांचा लढा तुम्हाला काय कळणार ?

६५ वर्षात कर्नाटकाने मराठी लोकांसाठी काय केले याच एक तरी उदाहरण द्या ? मराठी लोकांना मदत होईल असे कोणते सहकार्य केले? मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कोणती तरतूद केली ? या उलट मराठी भाषेची गळचेपी केली. कर्नाटकात राहून कन्नड शिकण्याची जबरदस्ती केली. कन्नड शिकलो पुढे काय ? मानसन्मान मिळाला का ? तो हि नाही . मातृभाषा मराठी म्हणून कायम हिणवलं गेलं , नाकारलं गेलं एवढाच काय लाथाडले गेले. किड्या मुंग्याच आयुष्य जगणाऱ्या मराठी माणसाने न्याय हक्कासाठी उभे राहणे म्हणजे देशद्रोह होतो का ?

या सीमाभागात कोवळ्या कोवळ्या पोरांवर लढ्यात सहभाग घेतला म्हणून गंभीर गुन्हे घालून न्यायालयाच्या पायऱ्या झिजवताना दाखवतो. कोवळ्या जीवापासून वृद्धांपर्यंत झालेल्या जखमा दाखवतो. मराठी म्हणून बेरोजगार असणारे तरुण दाखवतो. कन्नड समजत नाही म्हणून जमिनी गमावलेले शेतकरी दाखवतो. गुन्हेगार म्हणून वागविणाऱ्या नजरा दाखवतो. अरे या बेळगावात मराठी भाषा जगावी म्हणून झगडणारी जनता दाखवतो. 

स्वाभिमान आणि अभिमान या राजकीय पक्ष्याचे जोडे चाटून कळत नाही. त्यासाठी त्याग करावा लागतो. तो त्याग आम्ही सीमावासियांनी केलाय. आज महाराष्ट्र उभा आहे तो आम्ही सांडलेल्या रक्तावर उभा आहे. 

कर्नाटकाला हिम्मत असेल तर १ वर्ष सीमाभागातील मराठी जनतेकडून कर  घेणे बंद करून दाखवावं तुम्हाला कळेल, कि तुमच्या जीवावर नव्हे तर मराठी लोकांच्या जीवावर या राज्याचा गाडा चालू आहे. 

आता थांबणे नाही न्यायालयातील लढा चालू आहे त्यासाठी आमच्या जेष्ठानी खस्ता खाल्या कर्ज काढली आम्ही पुढची पिढी पण तो त्रास भोगायला तयार आहोत. पण संयुक्त महाराष्ट्र पूर्ण झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही . पक्ष्याचे लेबल लावून खुशाल आमचा लढा चिरडण्याचा प्रयत्न करा, पण  उचलेले पाऊल आता थाम्बणार नाही. 

ब्रिटिशांच्या एका अधिकाऱ्याने लिहले होते कि त्यांना "हा देश ब्रिटिश सैन्याच्या  जोरावर मिळाला नाही तर त्या ब्रिटिश सैन्यात असणाऱ्या भारतीय लोकांमुळे मिळाला ."  पण त्या सैनीकांना पण एक दिवस आपल्या चुकीची जाणीव झाली आणि १८५७ चे बंड झाले. शेवट त्याला सुद्धा अनेक दशके गेली आणि शेवट "चले जावो" चळवळ अली. आताही त्याची पुनरावृत्ती होईल. हे जग गोल आहे फिरून तिथेच यावं लागत. एक दिवस राजकीय पक्ष्याचे जोडे उचलणाऱ्या लोकांना त्यांच्या चुकीची जाणीव होईल पण त्या वेळी तुम्हाला माफ करणारा समाज असेल कि नाही याची शाश्वती नाही. आता हि मराठी माणसाची शिवगर्जना समजा आणि लढ्यात झोकून द्या . या लढ्याला आमच्या बापजाद्यांनी आहुती दिली आहे. विकासाच्या गोंडस नावाखाली त्याचा बळी  देऊ नका. 

बेळगाव कारवार निपाणी बिदर  भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. 

नाही नाही कधीच नाही कर्नाटकात  राहणार नाही. 

पियुष नंदकुमार हावळ 

बेळगाव

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रा स्वतःच्या अस्तित्वासाठी जागा हो..संयुक्त महाराष्ट्राचा धागा हो..

मराठीच्या पाऊलखुणा :- केरळ-कर्नाटकच्या सीमेवरील कासारगोड येथील मराठी लोक

माय मराठी.. माझी आई..